Gallery
To be friends With Museum
         Email Id:

चित्रकार डी. डी. रेगे संत वस्तूसंग्रहालयाविषयी

महाराष्ट्र हा संतसत्पुरुषांचा देश म्हणून ओळखला जातो. इथली भूमी ज्ञानेश्र्वरादी महानुभावांपासून अनेक संतसत्पुरुषांपर्यंत बहरली आहे, पावन झाली आहे. कर्म, ज्ञान, भक्ती आणि योगमार्गाचा पुरस्कार करणारे अनेक सिद्धसत्पुरुष महाराष्ट्रातील विविध भागात कार्यरत होते. प्रत्येकाचा आपापला पंथ, संप्रदाय होता, प्रत्येकाचे वैशिष्ट्य आणि कार्यशैली भिन्न होती, विचार आणि आचार भिन्न होते. तरीही त्यांचा मार्ग एकच होता आणि तो होता मोक्षसुखाकडे घेऊन जाणाऱ्या परमार्थप्राप्तीचा.
अवलिया, फकीर, विदेही, परमहंस, अवधूत अशा स्वरूपातील अनेक संतमंडळी या काळात महाराष्ट्रभूमीवर अवतरली आणि जनमानसात स्थिरावली. त्यांच्या वास्तव्यामुळे विविध ठिकाणचा परिसरही नावारूपास आला, त्यामुळेच की काय अक्कलकोट म्हटलं की स्वामी समर्थ, सज्जनगड म्हटलं की रामदास आठवतात. शिर्डीचे साईबाबा, शेगांवचे गजानन महाराज, गोंदवल्याचे गोंदवलेकर महाराज, साकोरीचे उपासनीबाबा, माधानचे गुलाबराव, कोल्हापूरचे श्रीकृष्ण सरस्वती, पावसचे स्वरुपानंद, पुण्याचे शंकर महाराज, माणगावचे वासुदेवानंद सरस्वती अशी अनेक दिग्गज, दैवी व्यक्तिमत्त्व त्या त्या परिसरालाही ओळख प्राप्त करून देती झाली.
अशी अनेक संतश्रेष्ठ मंडळी महाराष्ट्राच्या विविध भागात प्रसिद्ध असली तरीही विखुरलेल्या अवस्थेतील या 70 हून अधिक संतश्रेष्ठांच्या नित्य वापरातील वस्तूंचा दुर्मीळ अलौकिक ठेवा मात्र एका छताखाली गुण्यागोविंदाने नांदतोय, तो पुण्यानजीकच्या घोरपडी गावातील कलाशंकर नगर परिसरात. येथील रतन एन्क्लेव्ह या बंगलीवजा गृहसंकुलातील शिवदुर्गा मराठे यांच्या वास्तूमध्ये 70 हून अधिक संतसत्पुरुषांच्या 160 हून अधिक प्रासादिक वस्तूंच्या साक्षीने जणू महाराष्ट्रातील अनेक प्रसिद्ध अप्रसिद्ध अशा संतश्रेष्ठांची मांदियाळीच अवतरली आहे. जुन्या जमान्यातील प्रख्यात चित्रकार डी. डी. रेगे या नावाने सुपरिचित असलेल्या दत्तात्रय धोंडो रेगे यांनी प्रसंगी अक्षरशः पदरमोड करून जमविलेला हा आगळावेगळा संतवस्तू संग्रह त्यांनी भाविक आणि सश्रद्ध जनतेसाठी या प्रदर्शनीय वास्तूद्वारे खुला करून दिला आहे.
इथं आपल्याला महाराष्ट्रातील अनेक लोकप्रिय व प्रख्यात अशा संतश्रेष्ठांचा त्यासोबतच काहीशा अप्रसिद्ध तरीही त्या काळात लोकप्रिय असलेल्या अनेक संतसत्पुरुषांच्या दैनंदिन वापरातल्या वस्तूंचा संग्रह पाहावयास मिळतो. वानगी दाखल सांगायचे झाले तर अक्कलकोटकर स्वामी समर्थांच्या दैनंदिन वापरातील भरजरी उंच टोपी, नित्य वापरातील शाल, माणिकप्रभू, जंगली महाराज, श्रीधर स्वामी, श्रीकृष्ण सरस्वती, मॉं आनंदमयी अशा संतश्रेष्ठांच्या पादुका, खडावा, त्याचप्रमाणे वासुदेवानंद सरस्वती, गोंदवलेकर महाराज, ताजुद्दिन बाबा, माधवनाथ (चित्रकूट), स्वरुपानंद (पावस), सत्यसाईबाबा, गगनगिरी महाराज, पुंडलिकबाबा, नारायण महाराज (केडगाव), मेहेरबाबा, उपासनीबाबा (साकोरी), गाडगेबाबा, साधू वासवानी, दासगणू, उपळेकर महाराज, श्रीधर स्वामी, नृसिंह सरस्वती (आळंदी), मिटकर महाराज, गुलाबबाबा, गुळवणी महाराज, गुरुदेव रानडे, चिले महाराज, रजनीश अशा अनेक सत्पुरुषांच्या नित्य वापरातील कपडे, शाल, उपरणे आणि वस्तू इतकेच नाही तर शिर्डीचे साईबाबा (चांदीचे पैसे, करदोटा, लंगोट, पादुका), श्रीशंकर महाराज (रुद्राक्ष माळ, जांबिया), संत बाबाजान (कटोरा) तुकडोजी (खंजिरी), डॉ. सय्यदना (जपमाळ), समर्थ रामदास (मारुतीची मूर्ती), गजानन महाराज (चिलीम), कल्याण स्वामी (चंची), साटम महाराज (हंडा), श्रीशंकराचार्य (लक्ष्मी-नृसिंह मूर्ती), बाळेकुंद्री पंत महाराज (काठी) यांच्या अशा अनेक वस्तू या संग्रहालयात आहेत. या वस्तू संग्रहालयाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे असणारी संतश्रेष्ठांची दुर्मीळ कृष्णधवल छायाचित्रे. डी. डी. रेगे यांनी पेंटिंग्ज व्यतिरिक्त छायाचित्रणातून साकारलेली ही प्रकाशचित्रे अतिशय दुर्मीळ आणि महत्त्वपूर्ण आहेत.
आणखी