Gallery
  About D D rege
कुटुंबवत्सल 'डी. डी. रेगे' :
डी. डी. रेगे यांचा जन्म 17 डिसेंबर 1911 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर नजीकच्या 'पाचल' या गावी झाला. बालपण कोकणातल्या निसर्गसमृद्ध परिसरात गेले. याच परिसराने डी. डी. रेगे यांच्यातील कलाकाराला जागृत केले, कलाविष्काराकडे पाहण्याची रसिक नजर बहाल केली. पुढे काही कारणाने, सातारा येथे स्थलांतरित झाल्यावर न्यू इंग्लिश स्कूल, सातारा आणि तात्कालिक सरकारी हायस्कुलात दाखल झालेल्या डी. डी. रेगे यांना शालेय शिक्षणासोबत चित्रकलेचा लळा लागला.
ते दिवस होते ब्रिटिश विरोधी आंदोलनाचे. नकळतच डी. डी. रेगे यांच्या मनाच्या तळाशी देशप्रेमाचे, स्वातंत्र्यप्राप्तीचे विचार अगदी खोलवर झिरपले होते, त्यात भरीसभर म्हणून रत्नागिरीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा प्रदीर्घ सहवास त्यांना लाभला. साहजिकच डी. डी. रेगे यांच्या मनात क्रांतीची बीजं रोवली गेली. त्या ऊर्मीतच डी. डी. रेगे यांनी सैन्यदलात भरती होण्याचा निर्णय घेतला. एकीकडे कर्तव्य तर दुसरीकडे चित्रकलेची ओढ. मात्र मनाने कर्तव्याला श्रेष्ठ मानले आणि रेगे यांचा प्रवास युद्धभूमीकडे झाला.
यथावकाश युद्धभूमीवरून परतल्यावर डी. डी. रेगे यांनी आपल्या मूळ छंदाकडे अर्थात चित्रकलेकडे आपला मोर्चा वळवला. अल्पावधीतच चित्रकार डी. डी. रेगे म्हणून ते देशाविदेशात ख्यातकीर्त झाले. पहिली पत्नी सौ. यशवंती व द्वितीय पत्नी सौ. मालती यांच्यासोबत संसारसुखाची मार्गक्रमणा करणार्‍या डी. डी. रेगे यांचे प्रापंचिक आयुष्य समृद्ध झाले ते कन्येच्या, चि. शिवदुर्गा हिच्या आगमनाने. नामांकित चित्रकार, छांदिष्ट अवलिया, तपस्वी संग्राहक म्हणून भरभरून यश मिळविणार्‍या डी. डी. रेगे यांचा कौटुंबिक प्रवासही समृद्ध व संपन्न झाला.

चतुरस्र लेखक 'डी. डी. रेगे' :
आघाडीचे चित्रकार म्हणून नावलौकिक संपादन करीत असतानाच डी. डी. रेगे यांनी कुंचल्यासोबत लेखणीचे आव्हान देखील स्वीकारले. 1939 ते 1945 या दरम्यान झालेल्या दुसर्‍या महायुद्धात भाग घेणार्‍या चित्रकार डी. डी. रेगे यांच्या हाती राष्ट्रकवी रविंद्रनाथ टागोर यांच्या नोबेल पारितोषिक विजेत्या 'गीतांजली' या काव्यसंग्रहाची प्रत आली. विलक्षण झपाटल्यागत त्यांनी ती वाचून काढली. इतकंच नव्हे तर अधूनमधून मिळणारा वेळ त्यांनी 'गीतांजली'च्या काव्यवाचनात सत्कारणी लावला. लहानपणापासून समर्थ श्रीरामदासांबद्दल अतीव प्रेम व आदर असल्याने चित्रकार डी. डी. रेगे यांच्या मनात "आपणांसी जे जे ठावे ते इतरांसीही सांगावे' अशी इच्छा दाटून आली आणि धुमश्र्चक्रीने व्यापलेल्या त्या समरांगणावर 'गीतांजली' या काव्याचा मराठी भावानुवाद त्यांच्या हातून साकारला गेला. या अनुवादाचे खुद्द रविंद्रनाथ टागोरांपासून महात्मा गांधींपर्यंत अनेक दिग्गजांनी अतिशय कौतुक केले.
गीतांजलीच्या भावोत्कट अनुवादानंतर चित्रकार डी. डी. रेगे यांच्या हातून कलावंतांची शब्दचित्रे, श्रीसद्‌गुरु नारायण महाराज (चरित्र), क्रिकेटवीरांच्या तीन पिढ्या, संतश्रेष्ठ गोविंद (चरित्र), पुणे व प्राचीन धार्मिकस्थाने, श्रीगोविंदविजय (पोथी), श्रीजंगली महाराज (संशोधन), संतप्रसाद भाग 1 व 2 तसेच चित्रे नियतीची (आत्मवृत्त) अशी लेखनसंपदा लिहून झाली. त्यासोबतच दै. सकाळ आणि दै. स्वराज्य यांसारख्या पुण्यातील प्रतिष्ठित वर्तमानपत्रातून त्यांनी केलेल्या सदर लेखनानेही एक काळ गाजविला.

तपस्वी संग्राहक 'डी. डी. रेगे' :
चित्रकार म्हणून डी. डी. रेगे उभ्या महाराष्ट्राला सुपरिचित असले तरी त्यांचे अतिशय महत्त्वपूर्ण कार्य आहे ते म्हणजे, संतवस्तू संग्रहालयाची उभारणी. चित्रकार डी. डी. रेगे यांनी महाराष्ट्राच्या अनेकविध भागातील अनेक प्रसिद्ध, अप्रसिद्ध संतश्रेष्ठांच्या नित्य वापरातील, नित्य हाताळलेल्या वस्तूंचे संग्रहालय करण्याचा ध्यास घेतला. या उपक्रमाची सुरुवात बेट केडगावच्या नारायण महाराजांमुळे झाली. बेट केडगाव येथे चित्रकार डी. डी. रेगे यांनी नारायण महाराजांचे भव्य पेंटिंग्ज करून दिले त्यावेळी प्रसाद म्हणून नारायण महाराजांच्या नित्य वापरातील वस्तू (जरीची टोपी, कौपीन) चित्रकार डी. डी. रेगे यांना प्रसादभेट म्हणून दिल्या गेल्या. यांतूनच चित्रकार डी. डी. रेगे यांच्या मनांत संतवस्तूंचा संग्रह करण्याची ऊर्मी दाटून आली आणि एकामागोमाग एक अशा अनेक संतश्रेष्ठांच्या नित्य वापरातील वस्तूंचा संचय त्यांच्याकडे होत गेला. पाहता पाहता, चित्रकार डी डी. रेगे हे नाव पुन्हा एकदा खर्‍या अर्थाने प्रकाशात आले.
श्रीस्वामी समर्थांच्या नित्य वापरातील रेशमी टोपी, श्रीगजानन महाराजांची चिलीम, ब्रह्मचैतन्य श्रीगोंदवलेकरांचे मृगाजीन (आसन) अशा विविध वस्तूंचा संचय होत गेला. पुढे मात्र हा ध्यास चित्रकार डी. डी. रेगे यांची चांगलीच परीक्षा पाहता झाला. संतसाहित्य जमा करण्याच्या या अनोख्या छंदापायीच वाटेल तितका पैसा खर्च करून ते महाराष्ट्रातील कानाकोपर्‍यात फिरले. प्रसंगी पदराला खार लावून त्यांनी संतवस्तूंचा संग्रह करण्यास सुरुवात केली. कधी दैव अनुकूल झाले मात्र बरेचदा प्रतिकूल परिस्थितीशीही त्यांना या छंदासाठी अनेकदा सामना करावा लागला, झगडा द्यावा लागला. अनेक आघात, मनस्ताप, अवहेलना यांना सामोरे जावे लागले. आर्थिक कुचंबणा, ओढगस्तीचा संसार यातून मार्ग काढीत डी. डी. रेगे यांनी त्यांचा छंद निव्वळ जोपासलाच नाही तर वृद्धिंगत देखील केला. त्यांचा हा उपक्रम, आजही 'संतवैभवाची साक्ष' देत ठामपणे उभा आहे.

चित्रकार 'डी. डी. रेगे' :
डी. डी. रेगे यांचे बालपण कोकणातल्या निसर्गसमृद्ध परिसरात गेले. याच परिसराने डी. डी. रेगे यांच्यातील कलाकाराला नैसर्गिक कलाविष्काराकडे पाहण्याची रसिक नजर बहाल केली. पुढे काही कारणाने सातारा येथे स्थलांतरित झाल्यावर न्यू इंग्लिश स्कूल, सातारा आणि तात्कालिक सरकारी हायस्कुलात दाखल झालेल्या डी. डी. रेगे यांना शालेय शिक्षणासोबत चित्रकलेचा लळा लागला. पुढे तरुणवयात चित्रकला ही केवळ छंद म्हणून न राहता डी. डी. रेगे यांच्या उपजीविकेचे साधन बनले आणि पाहता पाहता ते आसमंतात "चित्रकार डी. डी. रेगे' म्हणून प्रसिद्धीस आले.
उपजत धडाडी, कलेचा व्यासंग आणि बहुश्रुतपणा यांच्या भांडवलावर डी. डी. रेगे यांचा कलाव्यवसायात जम बसला. मोठमोठ्या लष्करी अधिकाऱ्यांच्या पेंटिंग्जची कामे मिळू
लागली. नामांकित समाजपुरुष, नेते, संतमंडळींची "पेंटिंग्ज' करणार्‍या चित्रकारांमध्ये डी. डी. रेगेंचे नाव गाजू लागले. पाहता पाहता पेंटिंग्जची कामे घराचा उंबरठा ओलांडून त्यांच्यापाशी चालत येऊ लागली आणि सातार्‍याहून पुणे येथे मुक्कामास आलेल्या डी. डी. रेगे यांचा चित्रकार म्हणून दबदबा वाढला.
ना. यशवंतराव चव्हाण, रॅंग्लर परांजपे, न्या. छगला, डॉ. भांडारकर, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, सावरकर, जवाहरलाल नेहरू, डॉ. आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, आचार्य विनोबा, आचार्य प्र. के. अत्रे, महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक, बॅ. जयकर या व अशा नामांकित व्यक्तींची काढलेली पोट्रेट पेंटिंग्ज देशभरात नावाजली गेली. व्यक्तिचित्र रेखाटण्याचे त्यांचे कसब देशपातळीवर गौरवले गेले. सी. डी. देशमुख, बुल्गानीन (रशिया), चौ-एन-लाय (चीन) अशा दिग्गजांकडून चित्रकार डी. डी. रेगे यांना पुरस्कार प्राप्त झाला. पार्लमेंट, असेंब्लीमध्ये राष्ट्रपुरुषांच्या भव्य पेंटिंग्जच्या निर्मितीचे काम करण्याची संधी मिळाली आणि चित्रकार डी. डी. रेगे यांनी त्या संधीचे सोनेही केले. सामाजिक क्षेत्रातील महनीय व्यक्तींच्या चित्रांची कामे करत असतानाच अध्यात्मक्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेक देवस्थानातून, मंदिरातून देवदेवतांची, संतसत्पुरुषांची चित्रे साकारण्याविषयीची आमंत्रणेही रेगे यांच्याकडे येऊ लागली.
अशा तर्‍हेने जगप्रसिद्ध व्यक्ती सोबतच, पौराणिक व ऐतिहासिक व्यक्तींची पेंटिंग्ज साकारण्याची संधीही डी. डी. रेगे यांना लाभली आणि अल्पावधीतच पुण्यनगरीतील त्यांची ओळख प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व म्हणून दृढ झाली.


Close it
Close it
Close it
Close it
Close it