Categories
Gallery

या उपक्रमाची सुरुवात झाली ती बेट केडगावच्या श्रीनारायण महाराजांमुळे. बेट केडगाव येथे डी. डी. रेगे यांनी श्रीनारायण महाराजांचे भव्य पेंटिंग्ज करून दिले त्यावेळी श्रीनारायण महाराजांच्या नित्य वापरातील वस्तू (जरीची टोपी, कौपीन) चित्रकार रेगे यांना प्रसादभेट म्हणून देण्यात आल्या. यांतूनच डी. डी. रेगे यांना संतवस्तूंचा संग्रह करण्याची ऊर्मी दाटून आली. पुढे एकामागोमाग एक, अनेक संतश्रेष्ठांच्या नित्य वापरातील वस्तूंचा त्यांच्याकडे संचय होत गेला. स्वामी समर्थांच्या नित्य वापरातील उंच टोपी, गजानन महाराजांची चिलीम, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकरांचे मृगाजीन (आसन) अशा विविध संतवस्तूंच्या रूपाने डी. डी. रेगे यांना संतसाहित्य जमा करण्याचा जणू छंदच लागला होता. त्यासाठी वाटेल तितका पैसा खर्च करून ते महाराष्ट्रातील कानाकोर्‍यात फिरले. प्रसंगी पदराला खार लावून त्यांनी संतवस्तूंचा संग्रह करण्यास सुरुवात केली. कधी कधी दैव अनुकूल झाले मात्र बरेचदा प्रतिकूल परिस्थितीशीही त्यांना सामना करावा लागला, झगडा द्यावा लागला. अनेक आघात, मनस्ताप, अवहेलना यांना सामोरे जावे लागले. आर्थिक कुचंबणा, ओढगस्तीचा संसार यातून मार्ग काढीत डी. डी. रेगे यांनी त्यांचा छंद निव्वळ जोपासलाच नाही तर वृद्धिंगत देखील केला आणि यातूनच डी डी. रेगे संत वस्तू संग्रहालयाची निर्मिती झाली. त्यांचा हा उपक्रम त्यांच्या कन्येच्या रूपानं आजही संतवैभवाची साक्ष देत ठामपणे उभा आहे.
आवाहन :
डी. डी. रेगे संतवस्तू संग्रहालयामध्ये अनेकविध संतसत्पुरुषांच्या नित्य वापरातील वस्तू उदा. वस्त्रे, पादुका, खडावा, पूजेतील सामान, मूर्त्या असे विविध प्रकार आहेत. या सर्व वस्तूंना शतकी परंपरा व दीर्घायुष्य लाभलं आहे, मात्र नैसर्गिक वातावरणात योग्य त्या प्रकारे काळजी न घेतल्यास त्यांचे विघटन होण्याचा धोका संभवतो. कापडी वस्तूंना "कसर' लागण्याचा धोका असतो. त्यामुळे या वस्तूंच्या देखभालीचा खर्चही तितक्याच मोठ्या प्रमाणात असतो. या प्रत्येक वस्तूंना कुलूपबंद कपाटातून ठेवण्यासाठी येणारा तसेच सजावटीचा व सुरक्षिततेचा खर्चही बर्‍याच मोठ्या प्रमाणात होता. हा खर्च सोसून आळंदी येथे संतवस्तू संग्रहालय उभारले गेले मात्र या देखभालीसाठी कोठूनही अनुदान किंवा मदतीचा ओघ आला नाहीच शिवाय चोर्‍यामार्‍या, धाकदपटशा दाखवून रेगे कुटुंबीयांना मनस्ताप मात्र देण्यात आला. मदत करण्याच्या हेतूने आलेल्या सधन आणि सालस (?) मंडळींचा कल पैशाच्या बदल्यात तिथून एखादी वस्तू स्वतःकडे घेता येईल का? याकडे असायचा. त्यामुळे आळंदी येथून हे संतवस्तू संग्रहालय हालवण्यात आले. सध्या हा अलौकिक ठेवा शिवदुर्गाबाई आपल्या राहत्या घरी अतिशय निगुतीने आणि कसोशीने जतन करीत आहेत.
याविषयी अधिक माहिती देताना शिवदुर्गा मराठे सांगतात, ""आमच्या वडिलांचा समाजकारण, राजकारण आणि कलाक्षेत्रामध्ये दबदबा होता, नाव होतं, गाठीशी फारसा पैसा नसला तरी प्रसिद्धी होती याचं कारण डी. डी. रेगे यांनी पैशापेक्षा समाजकार्याला महत्त्व दिलं. ओशो रजनीश यांच्या तारुण्यावस्थेतील दुर्मीळ छायाचित्रे आमच्या बाबांकडे होती. मात्र त्यासाठी स्वार्थी हेतूने देऊ केलेली मदत त्यांनी नाकारली. जिवापाड जपलेला हा संग्रह पैशाच्या लालसेपायी एखाद्याला विकणे त्यांच्या तत्त्वात बसत नव्हते. महान संतश्रेष्ठांनी आपलं आयुष्य भाविकांसाठी, भक्तांसाठी निःस्वार्थीपणे खर्ची घातले. त्यांच्या नित्यवापरातील वस्तू जतन करून हा अमूल्य ठेवा पुढील पिढीसाठी स्मारक म्हणून उपयोगी आणावा याकडे त्यांचा कटाक्ष होता. त्यामुळे त्यांनी कधीही पैसे आकारून हा ठेवा दर्शनार्थ ठेवला नाही. आजही आपणांस हे संतवस्तू प्रदर्शन विनामूल्य पाहता येते यामागे बाबांचा हा विचारच कारणीभूत आहे.''
आपल्या वडिलांनी जिवापाड जपलेला, अथक परिश्रमाने मिळवलेला हा "अलौकिक संतप्रसाद' जमेल तितक्या निगुतीने जतन करावा, भाविकांसाठी सहजगत्या दर्शनार्थ तो उपलब्ध व्हावा, त्याचे व्यवसायीकरण होऊ नये यासाठी शिवदुर्गाबाई दक्ष आहेत. डी. डी. रेगे यांचे हे "संचित' त्यांना येणार्‍या पिढीपर्यंत पोहोचवायचे आहे. त्यासाठी निरपेक्ष वृत्तीने मदत करण्याचे आवाहन त्या समाजातील जबाबदार व्यक्तींकडे करतात. कसलीही अपेक्षा न बाळगता या अलौकिक संतवस्तूंचे जतन करण्यासाठी मदतीचा हात पुढे करणार्‍या श्री. नरेंद्र हेटे यांच्या सारख्या सहृदय उद्योगपतींच्या भूमिकेचे त्या स्वागत करतात.
श्री. नरेंद्र हेटेंसारख्या निःस्वार्थी बुद्धीने आर्थिक सहकार्य करणार्‍या एका निर्मळ अंत:करणाच्या सश्रद्ध भाविकाचे सहकार्य मिळाल्याने चित्रकार डी. डी. रेगे यांच्या अथक व अविश्रांत पायपिटीतून साकारलेले हे "संतवस्तू संग्रहालय' आज केवळ पुणेच नाही तर महाराष्ट्र व देशाचीही शान ठरले आहे. इतकंच नव्हे तर आध्यात्मिक क्षेत्रातील मैलाचा दगड म्हणून "चित्रकार डी. डी. रेगे संग्रहालय' आज सर्वत्र ओळखले जाते.