Book

Detail:

गोविंद विजयमहाराष्ट्र हा संतसत्पुरुषांचा देश म्हणून ओळखला जातो. इथली भूमी ज्ञानेश्र्वरादी महानुभावांपासून अनेक संतसत्पुरुषांपर्यंत बहरली आहे, पावन झाली आहे. कर्म, ज्ञान, भक्ती आणि योगमार्गाचा पुरस्कार करणारे अनेक सिद्धसत्पुरुष महाराष्ट्रातील विविध भागात कार्यरत होते. प्रत्येकाचा आपापला पंथ, संप्रदाय होता, प्रत्येकाचे वैशिष्ट्य आणि कार्यशैली भिन्न होती, विचार आणि आचार भिन्न होते. तरीही त्यांचा मार्ग एकच होता आणि तो होता मोक्षसुखाकडे घेऊन जाणाऱ्या परमार्थप्राप्तीचा. अवलिया, फकीर, विदेही, परमहंस, अवधूत अशा स्वरूपातील अनेक संतमंडळी या काळात महाराष्ट्रभूमीवर अवतरली आणि जनमानसात स्थिरावली. त्यांच्या वास्तव्यामुळे विविध ठिकाणचा परिसरही नावारूपास आला, त्यामुळेच की काय अक्कलकोट म्हटलं की स्वामी समर्थ, सज्जनगड म्हटलं की रामदास आठवतात. शिर्डीचे साईबाबा, शेगांवचे गजानन महाराज, गोंदवल्याचे गोंदवलेकर महाराज, साकोरीचे उपासनीबाबा, माधानचे गुलाबराव, कोल्हापूरचे श्रीकृष्ण सरस्वती, पावसचे स्वरुपानंद, पुण्याचे शंकर महाराज, माणगावचे वासुदेवानंद सरस्वती अशी अनेक दिग्गज, दैवी व्यक्तिमत्त्व त्या त्या परिसरालाही ओळख प्राप्त करून देती झाली.